Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आमदार प्रताप सरनाईकांची खदखद, राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

आजपासून दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. याचदरम्यान, ईडीचा ससेमिरा मागे लागल्यापासून गायब असणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक विधानभवनात दाखल झाले. विधानभवनात दाखल झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकार विरोधातील खदखद बोलून दाखवली आहे.

प्रताप सरनाईक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्या विरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केला जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये मी चुकीचं काही केलं असं वाटत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. प्रताप सरनाईकांच्या या विधानामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

माझ्या पक्षाच्या प्रतोदने व्हीप बजावला आहे. त्यामुळे अधिवेशनाला आलो. देशात माझ्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. माझ्यावर कुणीही लेखी स्वरुपात आरोप केलेला नाही. मी कोणत्याही घोटाळ्यात असल्याचा कुणीही जबाब दिलेला नाही. एमएमआरडीएच्या प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यावर एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि ईडीकडे स्टेटमेंट दिलं आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तसेच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असंही सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *