संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
‘एमपीएससी’ चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीला विलंब झाल्याने आलेल्या नैराश्यातून पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला होता. त्या चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोणकर कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील आहे. लोणकर कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल. नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात स्वत: लक्ष घालत असून ‘एमपीएससी’ च्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात ‘एमपीएससी’ चे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भरतीप्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.