Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा ! – भास्कर जाधव

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भास्कर जाधवांकडून विरोधकांची पोलखोल

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत होते, असं सांगतानाच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं, अशा शब्दात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांचे कान उपटले.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरील चर्चे दरम्यान झालेल्या घटनेचा तपशील दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. सभागृहात ताणतणाव होत असतात. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढत असतात. सत्ताधारी विरोधकांवर धावून जातात. पण एकदा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं तर विषय तिथेच संपतो. मी सभागृहात कधीही कटुता ठेवत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आपण लोकशाहीच्या मंदिरात बसतो. आपण साधनसुचितेच्या गोष्टी करतो. सभ्यतेचा आव आणतो, पण आपण कसं वागतो?, असा सवाल करतानाच विधानसभा अध्यक्षांनी मला खुर्ची बसायला दिली. मी बसलो नाही. कारण मी अध्यक्ष-उपाध्यक्ष नाही म्हणून मी बसलो नाही. त्यानंतर फडणवीस आले. मी त्यांना बसायला खुर्ची दिली. चंद्रकांत पाटलांना खुर्ची दिली, याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.

विरोधकांचा गोंधळ गदारोळ सुरू होता. विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. हे आमदार घुसले तर घुसले, ते गावगुंडांप्रमाणे अंगावर तुटून पडत होते. तुमच्या सदस्यांना आवरा, आपण बसून चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं. पण विरोधी पक्षनेते त्यांना आवरायला तयार नव्हते. आम्ही आवरणार नाही, आम्हाला राग आलाय, असं विरोधी पक्षनेते म्हणाले, असं त्यांनी सांगितलं.

ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुख नाही, पण काळ सोकावला जाता कामा नये, म्हणूनच संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यावर पावलं उचलावीत, असे आदेश जाधव यांनी दिले. मी जर एकही असंसदीय शब्द बोललो असेल किंवा शिवी दिली असेल तर मी स्वत:हून शिक्षा घ्यायला तयार आहे. तुम्हाला जी शिक्षा वाटत असेल ती मी घेईन. मी आक्रमक आहे. पण कधीच असंसंदीय शब्द वापरला नाही. आजचा दिवस माझ्या आयुष्यात काळा दिवस आहे, असंही ते म्हणाले.

झाल्याप्रकारबद्दल आशिष शेलार यांनी माझी माफी मागितली आहे. फक्त त्यांनीच दोन-तीन वेळा माझी माफी मागितली. हे म्हणजे आधी लाथ लावायची आणि मग सॉरी म्हणायचं असा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *