संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
भाजप नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद तसा जुनाच आहे, अनेकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व राणे व त्यांचे दोन पुत्र यांच्यादरम्यान शाब्दिक चकमकी घडतच असतात. महाविकास आघाडी असतानापासून नारायण राणे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर सडकून टीका करत आहेत. आता नारायण राणे यांच्या नव्या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकत्याच केलेल्या विधानात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांची तुलना थेट उंदराशी करून टाकली सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष बांधणीसाठी विविध भागात शिवसंवाद यात्रा करत आहे, नेमके याच मुद्द्याला धरून नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहाय्याने टीव टीव करत हा उंदीर राज्यभर फिरत असल्याची जहरी टीका राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ते स्वकर्तृत्वावर राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, दसरा मेळावा आयोजित करण्याचा अधिकार केवळ एकनाथ शिंदे यांना असून, त्यांनी बोलावल्यास मी नक्की या मेळाव्याला येईल.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले की, केवळ बाळासाहेबांच्या नावावर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळाले होते, परंतु आता निवृत्त झालेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी घरी बसावे. अशा लोकांची स्वकर्तृत्वावर सरपंच देखील होण्याची लायकी नाही, असा खरमरीत टोला देखील नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.