संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
२५ लाखांचा राज्यातील प्रतिबंधित गुटखा जप्त करून कल्याण झोन – ३ च्या डीसीपी स्कॉड च्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मशाक इनामदार, लव सहानी, प्रेमचंद वाठोरे अशी या तिघांची नावे आहेत.
कर्नाटकहून उल्हासनगरला कल्याण येथील गांधारी मार्गे गुटख्याचा कंटेनर येणार असल्याची माहिती कल्याण झोन – ३ च्या डीसीपी स्कॉडचे पोलीस कर्मचारी ऋषिकेश भालेराव आणि संजय पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डीसीपी स्कॉड आणि खडकपाडा पोलीसांनी गांधारी रोडवर सापळा रचत भिवंडी पडघा मार्गे कल्याणमध्ये येत असलेला गुटख्याचा एक कंटेनर पोलीसांनी अडवला. त्या कंटेनरची तपासणी केली असता, त्यामध्ये ‘फोर के स्टार’ नावाचा गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. सदर गुटख्याची बाजारभाव किंमत अंदाजे २५ लाख रुपये आहे. दरम्यान, पोलीसांनी या तिघांना अटक केली असून, हा गुटखा कोणाला देण्यासाठी आणला गेला याचा पुढील तपास चालू आहे असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात आले.