संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण पुर्वेतील ‘आय’ प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या या भागात तुलनेने कमी लसीकरण झाले असल्यामुळे आज या परिसरापासून मोबाईल लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून हळू हळू लसीकरणाचा टप्पा वाढविला जाईल, या भागातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, या हेतूने ही सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली काशीकर, प्रभाग अधिकारी दिपक शिंदे उपस्थित होते.
‘आय’ प्रभाग कार्यालयाजवळ तसेच जाईबाई विद्यामंदिर, साई नगर, कल्याण पूर्व येथेही आज उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्याहस्ते आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप निंबाळकर व डॉ.पूर्वा भानूशाली यांच्या प्रमुख उपस्थितीत मोबाईल लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. या लसीकरणासाठी ४ बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या असून २ बसेस मध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध असेल आणि उर्वरित २ बसेस नागरिकांना लसीकरणानंतर देखरेखीखाली ठेवण्यासाठी उपलब्ध राहतील. दोन्ही ठिकाणी सुमारे ७०० नागरिकांचे लसीकरण आज दिवसभरात करण्यात आले.
महापालिकेच्या महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्रातही आज धान्य बाजारातील माथाडी कामगारांसाठी विशेष लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. तेथे सुमारे १५० माथाडी कामगारांचे लसीकरण करण्यात आले.