संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
वाहन हस्तांतर प्रक्रिया आता सहज आणि सोपी होणार आहे. ऑनलाईन असलेल्या या सेवेत काही कागदपत्रांची झेराक्स काढल्यानंतर त्यावर सही करून ती आरटीओत सादर करून कागदपत्र पडताळणीसाठी जावे लागते. मात्र येत्या एक ते दोन महिन्यांत ही सेवा आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे. वाहन मालकाची सर्व माहिती त्वरित आरटीओला उपलब्ध होणार आहे. परिणामी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आरटीओत जावे लागणार नसल्याने नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
आरटीओमधील नागरिकांची ये-जा कमी करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ऑनलाईन सेवेवर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिवहन विभागाने वाहन हस्तांतर सेवाही आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेऊन त्यावर काम सुरू केले आहे. जुन्या वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाहनाचे कायदेशीरपणे आरटीओतून नव्या मालकाच्या नावे हस्तांतर करायचे झाल्यास स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहन कर्जावर घेतले असल्यास त्याचा बोजा उतरविण्याची प्रक्रियाही करावी लागते. या प्रक्रियेत वाहनांची मूळ कागदपत्रे, अर्जावर जुन्या मालकाची संमती आदी बाबी आवश्यक असतात. विक्रेत्याचे आणि विकत घेणार्याचे घोषणापत्र, पीयूसी, विमा, नोंदणी, कर प्रमाणपत्र लागते. यासाठी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन करणे आणि काही कागदपत्रे डाऊनलोड करण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली असली तरीही कागदपत्रे डाऊनलोड करून त्याची झेराक्स काढावी लागते. त्यावर सही करून ती आरटीओत सादर करावी लागते. त्यामुळे वाहन मालकाचा बराचसा वेळ जातो.
ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी परिवहन विभागाने वाहन हस्तांतर प्रक्रिया आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन मालकाची सर्व माहिती उपलब्ध होईल. परिणामी सहीचीही आवश्यकता भासणार नाही. तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी आरटीओतील खेपाही वाचतील असे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले गेले आहे.