Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षेस तयार, नसेल तर सरकारने मला क्लीनचिट द्यावी : प्रताप सरनाईक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होत आहे. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाकडून पर्यायाने राज्य सरकारकडून क्लीनचिट देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्ष भाजपने १२ आमदारांच्या निलंबनाप्रकरणी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान आज अधिवेशनाचं काम सुरु झाल्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रताप सरनाईक आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभा राहिले. यावेळी माझ्यावर होणाऱ्या आरोपांनी सरकारची बदनामी होतेय. त्यामुळे गुन्हा केला असेल तर मी शिक्षेला तयार आहे पण केलाच नसेल तर मला क्लीनचिट देण्यात यावी अशी मागणी यावेळी सरनाईक यांनी केली.

माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. घोटाळा झालेला आहे की नाही हे तपासणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. एमएमआरडीए हे खातं सुद्धा राज्य सरकारकडेच आहे. माझ्यावर आरोप म्हणजे ते राज्य सरकारवर आरोप आहेत. कारण मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. पर्यायाने महाविकास आघाडीचा एक घटक आहे. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना काल एक पत्र दिलं आहे, असे सरनाईक सांगितले.

माझ्यावर आरोप झाल्याने राज्य सरकारची कुठेतरी बदनामी होत आहे, हे या पत्रातून मी गृहमंत्र्यांना सांगितलं. तसंच आज विधानसभेत बोलताना मी आज गृहमंत्र्यांना विनंती करु इच्छितो, की मी जे काल पत्र दिलं होतं त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून तो अहवाल आपण मागून घ्यावा. जर मी घोटाळा केला असेल तर मी गजाआड जायला तयार आहे. मिळेल ती शिक्षा भोगायला देखील तयार आहे. पण जर घोटाळा केलाच नसेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचा जर तपास पूर्ण झाला असेल तर मला मात्र राज्य सरकारकडून क्लिनचिट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली.

आर्थिक गुन्हे शाखेने लवकरात लवकर तो अहवाल गृह मंत्रालयाकडे सादर करावा आणि गृह खात्याने तो अहवाल लोकांपर्यंत पोहोचवावा. जेणेकरून लोकांच्या समोर सत्य परिस्थिती येईल, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *