संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या १-२ दिवसांत विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. नव्या मंत्र्यांची यादी जवळपास अंतिम झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अनेक नेते ज्यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. त्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. काही नेत्यांना फोनही करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा संध्याकाळपर्यंत हिमाचलवरून दिल्लीत परतणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील इंदूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण ५३ मंत्री आहेत. नियमांनुसार मंत्र्यांची संख्या ८१ असू शकते. अनेक नावांची यासाठी चर्चा सुरू आहे. विशेषत: ज्या राज्यात पुढील वर्षी निवडणूका होणार आहेत येथील कोणत्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार हे यंदा पाहणं गरजेचे आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनोवाल आणि वरूण गांधी या तीन नावाची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडण्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश नक्की असल्याचं बोललं जात आहे. आसाममध्ये सोनावाल यांनी हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनोवाल यांना दिल्लीत बोलावण्यात येईल असं म्हटलं जात होतं. आसाममधील भाजपमधील अंतर्गत वाद संपुष्टात आणण्यासाठी सोनोवाल यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच आक्रमक चेहरा असलेल्या वरूण गांधीं यांचाही केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता पक्षात दोन गट पडले आहेत. पशुपति पारस आणि मुलगा चिराग पासवान यांच्यात मतभेद झाल्यानंतर आता पशुपति पारस यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल असं बोललं जात आहे. बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
त्याचसोबत मनमोहन सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिलेले दिनेश त्रिवेदी यांच्याही नावाची चर्चा आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी त्रिवेदी यांनी भाजपात प्रवेश घेतला होता. ओडिसा येथून बैजयंत पांडा यांनाही केंद्रात संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्रातून गोपीनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रीतम मुंडे यांनी बीडमधून विजय मिळवला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत प्रीतम यांनी ७ लाखांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती.
महाराष्ट्रातील आणखी एक कॅबिनेटसाठी चर्चेत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दिल्लीतून फोन आला असून केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्यांनाही संधी दिली जाऊ शकते. शिवसेनेतून काँग्रेस, काँग्रेसमधून स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजपा असा नारायण राणेंचा राजकीय प्रवास झालेला आहे.
कॅबिनेटमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ वाजता ज्येष्ठ मंत्री आणि भाजपा अध्यक्षांसोबत बैठक घेणार होते मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.