मनोरंजन

स्वप्नांची नगरी ‘मुंबई’ सारखी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणं खरोखर शक्य आहे का?

मुंबई, प्रतिनिधी : दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूडच्या 50 हून अधिक प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांची भेट घेतली. उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात देशातील सर्वांत मोठी ‘फिल्म सिटी’ उभारण्याचा निर्णय घेतलाय.

नोएडामध्ये बनवण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीबद्दल चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारसोबतही चर्चा केली.

प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांसोबत फिल्म सिटीची रूपरेषा आणि बॉलीवुड समोरील आव्हानं या विषयावरही त्यांनी चर्चा केली.

पण, उत्तरप्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीमुळे मुंबईच्या फिल्म उद्योगाला धोका आहे का? यावर बॉलीवुडचं म्हणणं काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक आणि डिस्ट्रीब्यूडर राज बंसल बीबीसीशी बोलताना सांगतात, “हिंदी चित्रपटांसाठी मुंबई वगळता इतरत्र काहीच होत नसल्याचं माझं पहिल्यापासून मत आहे. जयपूरमध्ये आम्ही काही गोष्टी शक्य होतात का? यासाठी प्रयत्न केले होते. पण, काही होऊ शकलं नाही. उत्तरप्रदेश सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केलेत, ही चांगली गोष्ट आहे.”

ते पुढे सांगतात, “ही अत्याधुनिक फिल्मसिटी सुरू झाल्यानंतर चित्रपटांचं प्रॉडक्शन वाढण्यास मदत होईल. मुंबईत चित्रपटांसाठी काम फार मर्यादीत होतं. इथं टीव्ही सिरिअलचं काम खूप आहे. आता, वेब सिरीज बनू लागल्या आहेत. मोठे सेट उभारल्यामुळे फिल्मसिटी बूक होत होती. आता नोएडामध्ये फिल्मसिटी तयार होत असल्याने काम वाढेल. येत्या काही दिवसात चित्रपट निर्मीतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.”

बॉलीवूड स्टार्स मुंबईत रहातात. शूटिंगनंतर त्यांना आपल्या घरी जाणं सोपं असतं. मग, अशा परिस्थितीत आपलं घर सोडून ते नोएडामध्ये शूटिंगसाठी काही महिने रहाणं पसंत करतील?

यावर बोलताना राज बंसल म्हणतात, “असं आधी होत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आधी कलाकार एक दिवस शूटिंग केल्यानंतर तीन दिवस येत नव्हते. मात्र, आता चित्रपटांच्या शूटिंगसाठी ते घरापासून दूर रहातील. काम लवकरात-लवकर संपवण्याचा त्यांच्या प्रयत्न असेल.”

हल्ली, शूटिंग संपवून 40 दिवसात चित्रपट तयार होतो. शक्य तितक्या लवकर चित्रपटाचं शूटिंग संपवण्याची कलाकारांची अपेक्षा असते. त्यामुळे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांचा पैसा जास्त खर्च होणार नाही, असं बंसल पुढे सांगतात.

“मुंबईहून दिल्लीला जाणं सहज शक्य आहे. विमानांची संख्या जास्त आहे, पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे काहीच अडचण येणार नाही,” असं राज बंसल पुढे सांगतात.

बॉलीवुडमध्ये फक्त कलाकारच नाहीत. तर सेट्सवर काम करणारे मजूरही मोठ्या संख्येने काम करतात. मग या मजुरांचं काय? यावर बोलताना राज बंसल दाक्षिणात्य चित्रपटांचं उदाहरण देतात. ते म्हणतात, मुंबईतील मजुरांच नुकसान होणार नाही.

ते पुढे म्हणतात, “दक्षिण भारतातील चित्रपट निर्मात्यांची स्वत:ची टीम असते. काम करणारे मजूर वेगळे असतात. उत्तर भारतातून अनेक मजूर कामासाठी मुंबईत येतात. आता, नोएडामध्ये शूटिंग सुरू झालं तर मजुरांना कामासाठी मुंबईत यावं लागणार नाही. त्यांना त्यांच्या घराजवळच रोजगाराची संधी मिळेल.”

मला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते. अशा घोषणा अनेकवेळा करण्यात आल्या. यावेळी, ही फक्त घोषणाच राहू नये, तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असं बंसल यांच मत आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉई युनिअनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांच्या सांगण्यानुसार, “नोएडामध्ये फिल्म सिटी उभारल्यामुळे बॉलीवुडला नक्कीच फायदा होईल. फिल्म इंडस्ट्री मोठी होईल. चित्रपट बनवण्यासाठी आधी मुंबईत यावं लागत असे. आता उत्तरप्रदेशातील लोक आपल्या राज्यातच चित्रपट बनवू शकतील.”

“लखनऊमध्ये मोठ्या चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. सरकार दिड ते दोन कोटी रूपयांची सब्सिडी देत आहे. सद्य स्थितीत चित्रपट बनवण्यासाठी प्रोड्यूसर सोयी-सुविधांच्या शोधात असतो. खर्च कसा कमी करता येईल? कोणत्या शहरात स्वस्त पडेल? याचा विचार केला जातो,” असं ते पुढे म्हणतात.

परदेशात शूटिंगसाठी जाणाऱ्यांना 30-40 टक्के सब्सिडी मिळते. परदेशात चांगले लोकेशन आणि सुविधा मिळत असल्याने लोक बाहेर शूटिंग करतात.

दुसरीकडे भारतात मात्र फिल्मसिटीबाहेर शूटिंग करायचं असल्यास फार कठीण आहे. अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. परवानगी असेल तरी, महापालिका, पोलीस आणि रहिवासी अडवणूक करतात, याची खंत तिवारी व्यक्त करतात.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, परवानगी घेऊनही ही प्रॉपर्टी आमची आहे असं म्हणत लोक लूटतात.

तिवारी पुढे सांगतात, “ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील, त्याच ठिकाणी काम होईल. आता आमच्या स्पर्धेत अनेक लोक उतरले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत आले. त्यांनी बॉलीवुडशी चर्चा केली. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरूख खान आणि सलमान खान सारख्या कलाकारांनी उत्तरप्रदेशात शूटिंग केलं आहे.”

चांगल्या सुविधा मिळत असल्याने लोक उत्तरप्रदेशात जात आहेत. महाराष्ट्रात कोणीच लक्ष देत नाही. आम्हाला सरकारसोबत चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आम्हाला सरकारी बनवं लागतं, असा त्यांचा आरोप आहे.

बी एन तिवारी सांगतात, “सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर याचा परिणाम दिसून येईल. महाराष्ट्र सरकारने चांगल्या सुविधा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत.”

लेख सौजन्य : बीबीसी मराठी

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *