संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
महापालिकांतर्फे गर्भवतींचे कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरी अजून तसा लसीकरणाला विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईत आत्तापर्यंत केवळ १४५ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे.
गर्भवती महिलांना कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत विशेष धोका नसल्याचे जाणवले असले तरी दुसऱ्या लाटेत मात्र त्यांना तीव्र लक्षणे आढळली आहेत. पहिल्या लाटेत ‘नायर रुग्णालयात’ ११०० गर्भवती महिला कोरोनाच्या उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. यातील केवळ ८ महिलांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेमध्ये ४८५ बाधितांपैकी २६ महिलांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे. सुमारे १० ते १५ टक्के महिलांना तीव्र लक्षणे होती. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी खास लसीकरण उपलब्ध करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने गर्भवती महिलांच्या लसीकरणाला परवानगी दिली असली तरी कोरोनाचा संसर्ग झाल्यास संभाव्य धोके आणि प्रसुतीच्या काळात लसीकरणाचे माहीत नसलेले दुष्परिणाम याची माहिती दिल्यावर लस घेण्याचा निर्णय गर्भवतीचा असेल असे स्पष्ट केले आहे. लस घेण्याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण असून लसीकरणाबाबत अनेक शंकाकुशंका या महिलांमध्ये दरवळत आहेत. त्यामुळे लसीकरणाला अजून फारसा हवा तसा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
केंद्राच्या सूचनेनुसार मुंबईत पालिकेने १५ जुलैपासून ३५ रुग्णालयांत गर्भवती महिलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. याला आता दहा दिवस उलटले तरी पालिकेत आत्तापर्यंत केवळ ६१ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. सरकारी रुग्णालयात तर केवळ १४ महिलांनी अद्याप लस घेतली आहे. शहरात सुमारे दीड लाख महिला या गर्भवती असून त्या लसीकरणासाठी पात्र आहेत.