संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह
नवी मुंबई: ‘स्पा’च्या नावाखाली शरीरविक्रय चालविणाऱ्या सीबीडी सेक्टर-१५मधील दी थाई व्हीला ‘स्पा’वर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून ९ तरुणींची सुटका केली. या कारवाईत या मसाज पार्लरच्या मॅनेजरसह दोघांना पीटा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
सीबीडी सेक्टर-१५मधील अरेंजा प्लाझा या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या मसाज पार्लरमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली मुली ठेवून त्यांच्याकडून शरीरविक्रय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास या मसाज पार्लरमध्ये एक बनवाट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. या मसाज पार्लरमध्ये शरीरविक्रय सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर या कक्षाच्या महिला सहायक पोलिस निरीक्षक अलका पाटील, पोलिस उपनिरीक्षक विजय शिंगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक इनामदार, पोलिस हवालदार पिरजादे, उटगीकर, तायडे, कांबळे आदींच्या पथकाने तेथे छापा टाकला.
पोलिसांनी या ‘स्पा’चा व्यवस्थापक अमित ठक्कर व तेथे कामास असणारा मोहम्मद अफजल या दोघांवर पीटा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना अटक केली. पोलिसांनी यावेळी ९ तरुणींची सुटका केली. मसाज पार्लरमधील रोकड रक्कम आणि इतर आक्षेपार्ह वस्तू या पथकाने जप्त केल्या. या ‘स्पा’ची चालिका रिता ऊर्फ सिया असून ती या तरुणींकडून शरीरविक्रय करून घेत असल्याचे तपासात आढळून आले आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम ती घेत असून निम्मी रक्कम संबंधित तरुणींना देत असल्याची माहिती या तपासात उघड झाली.