संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह
मुंबई, ता 11 डिसें : १९ वर्षांखालील आशिया चषक या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या ज्यूनियर क्रिकेट निवड समीतीने २० जणांचा संघ घोषित केला आहे. या संघात जुन्नरचा सुपूत्र कौशल तांबे याचीही निवड झाली आहे.
ही स्पर्धा २३ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी २० जणांची संघात निवड झाली असून आणखी ५ खेळाडू राखीव असतील. असे एकूण २५ खेळाडूंचा संघ स्पर्धेपूर्वी बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव शिबीरात सहभागी होईल. हे सराव शिबीर ११ ते १९ डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.
आशिया चषकासाठी १९ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद यश धूळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, वसू वत्स याचाही २० जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. तो जर वेळेत फिट झाला, तरच तो ही स्पर्धा खेळू शकणार आहे.
तसेच जुन्नर तालुक्यातील कौशलचीही २० जणांच्या संघात निवड झाली आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या कौशलला यापूर्वी बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेत १९ वर्षांखालील भारत ब संघात संधी मिळाली होती. तसेच तो आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या विविध वयोगटातील संघाकडूनही खेळला आहे.
भारतीय संघाला पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिज येथे १९ वर्षांखालील वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने आशिया चषक महत्त्वाची स्पर्धा ठरणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने माहिती दिली आहे की या विश्वचषक स्पर्धेसाठी काही कालावधीनंतर संघ घोषित केला जाईल.
आशिया चषकासाठी असा आहे १९ वर्षांखालील भारतीय संघ-
हरनूर सिंग पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुळ (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (विकेटकीपर), राजनगड बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवन, रवी कुमार, रिषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स (फिटनेसवर अवलंबून)
राखीव खेळाडू – आयुष सिंग ठाकूर, उदय सहारन, शाश्वत डंगवाल, धनुष गौडा, पीएम सिंह राठोड