संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी तर शहरात ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरू
राज्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या १७ ऑगस्ट पासून ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचे लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. ‘टास्क फोर्स’ने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.
कोरोना मुक्त गावांमध्ये १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर शहरी भागांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
मार्गदर्शक तत्वे :
१) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
२) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
३) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
४)कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
५) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
६) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे.
७) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.