Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

नरेंद्र मेहताच्या उपस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचा नगरसेवक अनिल विराणीचा दावा खरा की खोटा?

“त्यांचा” काँग्रेसशी काडीचाही संबंध नाही” – प्रकाश नागणे (काँग्रेस प्रवक्ते, मिरा भाईंदर)

मिरा भाईंदर: जस जशी मिरा भाईंदर महानगर पालिकेची निवडणूक जवळ येत आहे तस तशी विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या राजकीय कोलांटउड्या मारणं सुरू झाल्या आहेत. अशाच प्रकारे आज रविवारी मिरारोड येथील प्रभाग 21 चे भाजपचे नगरसेवक अनिल विराणी यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत डॉ. स्वाती जगताप, दत्ता जगताप, भरतभाई शाह, संजय मोदी, राकेश गुप्ता, पिंकी मोदी, चंद्रकांत जगताप, मानव शाह, अनिता आंचन, भगवान मोरे या काही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सोशल मीडियावर फोटोच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी भाजपचे नगरसेवक अनिल विराणी यांचा हा दावा खोडून काढला असून जे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचा दावा अनिल विराणी करीत आहेत त्यांचा काँग्रेस पक्षाशी काडीचाही संबंध नाही, आपल्याच कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भासवून वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न अनिल विराणी करीत आहेत असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केला आहे.

त्याच बरोबर काँग्रेसचे मिरा भाईंदरचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून “जे कधी काँग्रेसचे साधे कार्यकर्तेही नव्हते व ज्यांचा कॉंग्रेसच्या विचारधारेशी काडीचाही संबध नाही अश्या काही लोकांना काँग्रेसचे पदाधिकारी सांगत मेहतांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. गटबाजीने शहरात भाजपची वाताहात झाली आहे, त्यात काँग्रेसचा वाढता जनाधार पाहून भाजप वाल्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्यानेच आपल्याच कार्यकर्त्यांना काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचे दाखवून नवीन नौटंकी चालू केल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी केला आहे.

या लोकांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतल्याची साधी पावती दाखवावी तसेच २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचा प्रचार केला व कोणत्या प्रभागात व कोणत्या बुथवर काम केले ते जाहीर करावे असे थेट आव्हानच प्रकाश नागणे यांनी दिले आहे.

या घटनेमुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा पुन्हा एकदा रंगू लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत असून त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांत ही रणधुमाळी आणखीनच वाढणार हे मात्र नक्की दिसत आहे.

मुळात आत्ताचे भाजपचे नगरसेवक अनिल विराणी हे एकेकाळी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष होते व माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसेन यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. शिवाय त्यांच्या पत्नी रेखा विराणी ह्या 2012 च्या महापालिका निडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून नगरसेविका झाल्या होत्या. नंतर 2017 च्या महापालिका निवणुकीच्या आधीच दोन्ही विराणी दांपत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता अनिल विराणी भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक आहेत. त्यामुळे मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते कोण? आणि भाजपचे कार्यकर्ते कोण? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही.

येणाऱ्या काही महिन्यांत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक इच्छुक उमेदवार आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत असतात. तर काही कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात आपल्या राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारे राजकीय कार्यकर्ते कोलांट उड्या मारताना दिसणार हे मात्र नक्की!

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *