संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा मुकाबला करण्यासाठी देशाला पर्यायी इंधन स्त्रोतांचा वापर करावा लागेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे. तसेच मालवाहतूक जलमार्गांना चालना द्यावी लागेल कारण ते वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त असून अनेकांचे बजेट कोलमडले आहे.
डिझेलला मिथेनॉल हा पर्याय
एका कार्यक्रमात मंत्री गडकरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन त्यांचे स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. डिझेलला मिथेनॉल हा पर्याय असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, ते डिझेलपेक्षाही स्वस्त आहे आणि डिझेल इंजिनला मिथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध आहे त्यामुळे डिझेलला पर्याय निर्माण होऊ शकतो.
मिथेनॉलमुळे खर्च ५० टक्क्यांनी कमी
जलमार्गाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देताना ते म्हणाले की, यामुळे व्यापार वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. नितीन गडकरी यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना मिथेनॉलच्या वापराचा विचार करून जलमार्गातून अधिक मालवाहतूक करण्याचा पर्याय पाहण्याची सूचना केली. नितीन गडकरी म्हणाले की, मालवाहतुकीसाठी जलमार्गांचा अधिक वापर केला पाहिजे. रस्त्याने वाहतुकीचा खर्च १० रुपये असेल तर तो रेल्वेमार्गे ६ रुपये आहे. दुसरीकडे, जलमार्ग वापरल्यास हा खर्च केवळ १ रुपयापर्यंत खाली येतो. सध्या वाहतूक खर्च खूप जास्त आहे. ते कमी करणे आवश्यक आहे.
मिथेनॉलवर चालणारी सागरी इंजिने विकसित करू
केंद्रीय मंत्री म्हणाले की, मिथेनॉलच्या वापरामुळे इंधनाचा खर्च ५० टक्क्यांनी कमी होईल. मिथेनॉलवर चालणारी सागरी इंजिने विकसित करू शकतो आणि डिझेल इंजिन त्यात बदललं जाऊ शकतं. आसाममध्ये दररोज १०० टन मिथेनॉलचे उत्पादन होते. हे उत्पादन दररोज ५०० टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तंत्रज्ञानात बदल करून डिझेल इंजिनचे रूपांतर मिथेनॉल इंजिनमध्ये केले तर त्याचा फायदा आसामला होईल. डिझेल इंजिनांना मिथेनॉल इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञान स्वीडिश कंपनीकडे आहे, असंही यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.