संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी मानपाडा रोड बाज आर.आर. हॉस्पिटल, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सिंग या दिनांक २४/११/२०२१ रोजी सकाळी १० वा चे सुमारास नेहरू मैदान, डोंबिवली पूर्व येथून रिक्षाने आर.आर हॉस्पिटल येथे जात असताना त्यांचा आयफोन ७, किंमत सुमारे २५,०००/- रुपये हा मोबाईल रिक्षामध्ये विसरला गेला होता. ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ झाला होता. त्यांनी तात्काळ डोंबिवली वाहतूक शाखा येथे संपर्क करून सदरबाबत माहिती दिली. त्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखेचे पोशि.स्वप्नील जाधव यांनी त्या रोडवरील साई पारिजात सोसायटी, गुरू छाया सोसायटी, डोंबिवली पूर्व या सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रिक्षा चा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कॅमेरा व रोडवरील अंतर जास्त असल्याने रिक्षा क्रमांक दिसत नव्हता. परंतु रिक्षा व रिक्षा चालकाच्या मिळालेल्या अस्पष्ट वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध घेऊन सदरचा मोबाईल शोधून आर.आर हॉस्पिटल चे प्रतिनिधी यांच्या ताब्यात दिलेला आहे.
डोंबिवली वाहतूक शाखेच्या या तत्परतेबद्दल आर.आर हॉस्पिटल चे संचालक डॉ.आमिर कुरेशी व डॉ.श्वेता सिंग यांनी वपोनि उमेश गित्ते यांचे आभार व्यक्त केले आहेत.