Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडताना मानपाडा पोलीसांनी सुशिक्षित चोराला रंगेहात पकडले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील मानपाडा पोलीसांच्या हद्दी मध्ये बंद असणाऱ्या एटीएम मशिनच्या गाळ्यातून ड्रीलमशीनचा आवाज येत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच सतर्कता बाळगून चोराला रंगेहात पकडले असून महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रीक पध्दतीने फोडुन गुन्हे केले असावेत असा संशय मानपाडा पोलीस व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे हा चोर उच्च शिक्षित असून तो सिस्को कंपनीत काम करत असल्याचे चौकशी दरम्यान सांगितले.

मध्य प्रदेश येथे राहणारा राहुल चोरडीया (वय ३५ वर्षे) यास अटक करण्यात आली असुन, त्याचेकडुन एटीएम फोडण्यासाठी लागणारे ₹ १४,३००/- चे साहित्य त्यात ड्रील मशीन, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तु मिळुन आलेल्या आहेत. शनिवारी रात्री दोन वाजता मानपाडा सर्कलचे ठिकाणी असलेल्या ऍक्सीस बँकेच्या एटीएमचे शटर हे बंद अवस्थेत होते. मात्र आतून कसला तरी आवाज येत असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. शटर ठोठावले असता आतून आवाज येणे बंद झाले. त्यामुळे पोलीसांचा संशय अधिक बळावला.

त्यानंतर पोलीसांनी हळूच शटर उघडल्या नंतर त्यानी पोलीसांना धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्याची गचांडी गुंडाळत मुसक्या आवळल्या आहेत. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाचे बॅगमध्ये एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहीत्य मिळुन आले, त्याने सदरचे साहित्य एटीएम मशीन तोडुन त्यातील पैसे चोरण्यासाठी जवळ बाळगले असल्याचा कबुली जबाब दिला. परंतु त्याचा चोरी करण्याचा सदरचा प्रयत्न गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीसांच्या सतर्कपणामुळे अयशस्वी झाला आहे.

अधिक तपास उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *