Latest News आपलं शहर कोकण महाराष्ट्र

कोविड रुग्णाची दिड वर्ष सेवा करून टाटा आमंत्रा क्वारंटाईन सेंटर बंद!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महानगरपालिकेने टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटर बंद करायचा निर्णय घेतला, त्यामुळे टाटा आमंत्रात दिड वर्ष सेवा देण्याऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय इ. कर्मचारी वर्गासाठी छोटेखानी समारंभ आयोजित केला होता . टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही असा आशावाद महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी यांनी व्यक्त केला. टाटा आमंत्राच्या निर्जिव इमारतींचा आत्मा म्हणजेच या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग. या कर्मचारी वर्गाने लोकांच्या मनामनात घर निर्माण केले आणि हे चांगली सेवा दिल्याशिवाय घडत नाही. येथील कर्मचारी वर्गाने अत्यंत कठिण परिस्थितीत काम केले. कोविडच्या पहिल्या लाटेत स्वत:च्या मनातील भितीवर मात करुन, कोविड रुग्णांच्या मनातील भिती घालवून एक कुटूंब म्हणून काम केले, हे निश्चितच खुप कौतुकास्पद आहे अशा शब्दात तेथे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे आणि दिड वर्ष सातत्याने तेथील कर्मचारी वर्गाबरोबर कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, प्रमोद मोरे, डॉ.दिपाली मोरे यांचेही आयुक्तांनी भरभरून कौतुक केले. टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर सध्या बंद केल्यामुळे तेथील कर्मचारी वर्गास वसंत व्हॅली आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयांत पोस्टिंग दिले जाईल,असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी बोलताना दिले.

महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी हे केवळ आयुक्तच नव्हे तर आपले फिलॉसॉफर, गाईड, फ्रेन्ड आहेत. त्यांच्या मुळेच आपण कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला समर्थपणे तोंड देवू शकलो, असे उद्गार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात काढले.भिती न बाळगता काम केल्याबाबत टाटा आमंत्रातील कर्मचारी वर्गाचे आणि त्यांना काम करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या कुटूंबियांचे कौतुक देखील त्यांनी आपल्या भाषणात केले. आम्ही येथे निरोप समारंभासाठी आलेलो नसून कोविड कालावधित येथे काम केलेल्या कर्मचारी वर्गाचे आभार मानायला आलेलो आहोत,असेही पुढे ते म्हणाले.

कोविडच्या पहिल्या लाटेत टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर सुरु करतांना अनंत अडचणींना तोंड दयावे लागले, सुरुवातीला तेथे काहीही सुविधा नव्हत्या, काम करण्याकरीता येण्यास माणसे घाबरत होती. अशा परिस्थितीत अडचणीतून मार्ग काढत काम सुरु ठेवले आणि टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर हे महाराष्ट्रातील एक उत्तम क्वारंटाईन सेंटर म्हणून वाखाणले गेल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.

टाटा आमंत्रामध्ये आतापर्यंत ४० हजार कोविड रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. त्याचप्रमाणे टाटा आमंत्रात संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी जलनि:सारण, पाणी पुरवठा, केटरिंग सुविधा पुरविण्यासाठी अनेकांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी उपायुक्त रामदास कोकरे, उपायुक्त सुधाकर जगताप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, डॉ.सरवणकर, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *