संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. संजयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे ? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन. आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा खरमरीत इशारा वाघ यांनी दिला आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. कालपर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखरियाल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता भाजपला कळलं की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायच्या. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळायचं पाहत आहे. म्हणून तो चित्रपट आला होता ‘शिक्षणाचा आयचा घो’ बरोबर आहे ते, असं संजय राऊत त्यांच्या ट्विट मध्ये म्हणाले होते.