संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. “राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्षच रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही”, असा खोचक टोला राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. काँग्रेस आता कुठे आहे का ? ती संपत चालली आहे. राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे आहे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा तेव्हा तो पक्षच रसातळाला जातो हा इतिहास आहे, असं राणे यांनी म्हटले.
सव्वा महिना झाला. राज्य सरकारचे वाभाडे काढले नाही. त्यामुळे मी १६ तारखेनंतर महाराष्ट्रात येणार आहे. राज्य अधोगतीकडे चाललंय. त्यामुळे लोकांना जागृत करणार आहे, असं सांगतानाच परत चिपळूणला जाणार असून पूरग्रस्तांशी चर्चा करणार आहे. मी गेल्या गेल्या केंद्र सरकारने ७०० कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारने केवळ दहा हजार रुपये दिले. लोकांनी ते पिंपात टाकले. आता ते फुगून बाहेर येतील, अशी मिश्किल टोला त्यांनी लगावला.