संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मागच्या बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेलया राजकीय नाट्याच्या पहिल्या अंकाला पूर्णविराम लागला असं म्हणता येईल. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला यंदाची विठ्ठल महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार हे स्पष्ट झालं. नुकतीच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे शिंदे यांनाच शासकीय महापूजेचा मान मिळणार आहे. उद्या म्हणजे रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, दुसरीकडे राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. निवडणूक आयोगाद्वारे परवानगी मिळाल्यासच मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौरा करता येणार आहे.
खरं तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेमक्या कोणत्या कार्यक्रमांना निवडणूक आयोग परवानगी देईल, यावर मुख्यमंत्र्यांचा दौरा अवलंबून असेल. मात्र अशा प्रकारची वेळ पहिली नाही. मागील काही वर्षांपूर्वी कार्तिकी यात्रेला आचारसंहिता लागू झाली होती. त्यावेळेस तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय महापूजेस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापूजेची परवानगी मिळेल अशी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान, विश्रामगृह येथे ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी!’ याचा समारोप सोहळा होईल. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम नियोजित आहे. तसंच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.