Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसित करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि ‘टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट’ यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि इंडिया हेल्थ फंड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील कौशल्य विकासविषयक विविध उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच स्किल इंडियाचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने हे सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज मंत्रालयात हे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेन्द्र सिंह कुशवाह, टाटा स्टाईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टच्या उपाध्यक्षा अनिता राजन, इंडिया हेल्थ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव जोशी यांच्यासह या संस्थांचे प्रतिनिधी अमेय वंजारी, राजर्षी मुखर्जी, श्रद्धा डे, सुहेल जमादार, अभिजीत कुमार, कौशल्य विकासच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण संचालक दिगंबर दळवी, नाविन्यता सोसायटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, देशातील प्रत्येकाला कुशल बनवून ‘स्किल इंडिया’ निर्मितीचे स्वप्न साकारण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. आपल्या लोकसंख्येचा देशाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासात योगदान घेण्याचे आपले ध्येय आहे. यादृष्टीने कौशल्य विकास विभाग विविध प्रभावी उपाययोजना राबवित आहे. विविध कार्यक्रमांमुळे राज्यात कौशल्य विकास, उद्योजकता, स्टार्टअप्सचा विकास यासाठी सुलभ वातावरण तथा इकोसिस्टीम तयार झाली आहे. आता टाटा स्ट्राईव्ह, टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट, इंडिया हेल्थ फंड अशा विविध संस्थांनीही या कामाता सहभाग घेतल्याने कौशल्य विकासाचे विविध उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात भौगोलिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील दुर्गम तसेच जंगल भागात आरोग्यविषयक सुविधा पोहोचविणे कठीण जाते. यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे हा प्रभावी उपाय ठरु शकतो. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासाला चालना मिळेल, त्याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कौशल्य विकासच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी सामंजस्य कराराच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टसमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून राज्यातील आयटीआयचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणास चालना देणे, उद्योजकता आणि नाविन्यतेसाठी विविध कार्यक्रम विकसीत करणे, मास्टर ट्रेनर्स तयार करणे, महिला, दिव्यांग व्यक्ती, एलजीबीटीक्यू, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजातील घटक अशा विविध वंचित घटकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच टाटा ट्रस्ट यांचा उपक्रम असलेल्या इंडिया हेल्थ फंडच्या माध्यमातून राज्यात आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना देण्यात येणार आहे. या स्टार्टअप्सना निधीची उपलब्धता, मार्गदर्शन, बाजारपेठेची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील वंचित घटक, दुर्गम भागातील घटक यांना आरोग्य सुविधा सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा विकास करणे, त्याअनुषंगाने स्टार्टअप्स विकसीत करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमती वर्मा यांनी दिली.

टाटा स्ट्राईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता राजन म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाबरोबर आज करण्यात आलेल्या भागीदारीमुळे राज्याच्या विविध भागात काम करण्याची संधी मिळाली आहे. येत्या काळात कौशल्य विकास विभागासमवेत राज्यातील विविध वंचित घटकांसाठी काम करता येईल. राज्य शासन आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करु, असे त्यांनी सांगितले.

इंडिया हेल्थ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव जोशी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि इंडिया हेल्थ फंड आरोग्य क्षेत्रात एकत्रित काम करेल. आरोग्य क्षेत्रात विविध कल्पक तंत्रज्ञानाचा विकास करणे, यासाठी स्टार्टअप्सना चालना देणे यासाठी येत्या काळात महाराष्ट्र शासन आणि इंडिया हेल्थ फंड एकत्रित काम करेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाचे अधिकारी आणि संस्थांचे पदाधिकारी यांनी सामंजस्य करारांचे आदान-प्रदान केले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *