Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

महानगरपालिका आणि नगरसेवकांच्या बेजबाबदारपणामुळे पडला बळी; पालिकेच्या वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

संपादक: मोईन सय्यद / मिरारोड: प्रतिनिधी

मीरारोड (18 मे) – मीरारोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात पत्राच्या खोलीत विजेचा प्रवाह वाहत असल्याची कल्पना नसल्याने दाराशी हात लावलेल्या शववाहिनीच्या चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन कर्मचाऱ्यांना सुद्धा विजेचा धक्का लागण्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे हा बळी गेल्याचा आरोप होत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर वसाहत भागात भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे . सदर रुग्णालयात प्रभाग समिती कार्यालय आदी सुरु केले असून इमारतीवर मजले वाढवण्याचे काम सुरु आहे. ह्या कामासाठी रुग्णालयात असलेली वाहन चालकांसाठीची पक्की खोली पालिकेच्या बांधकाम विभागाने चक्क ठेकेदारास सिमेंट आदी सामान ठेवायला दिली आहे. तर वाहन चालकांना पत्र्याची खोली बांधून देण्यात आली आहे .
तौक्ते चक्रीवादळा मुळे मुसळधार पाऊस पडत असल्याने पत्र्याच्या खोलीत व बाहेर पाणी साचले होते. सोमवारी रात्री ११. ३० च्या सुमारास शववाहिनीचे चालक धर्मलिंगम गोविंदन मुत्तू ( ६० ) रा. डॉ. आंबेडकर नगर, भाईंदर पश्चिम हे कामाची पाळी संपल्याने पत्र्याच्या खोलीत नोंदवही वर नोंद करून घरी जायला निघत होते. तर रात्रपाळी असल्याने राजेंद्र खेडेकर हे पालिका रुग्णवाहिकेची कर्मचारी आत येऊन बसले होते.

त्याचवेळी पत्र्याचे दार आणि पाण्याशी स्पर्श होताच धर्मलिंगम ह्यांना विजेचा जबर धक्का बसला आणि ते खालीच कोसळले. खेडेकर हे प्लास्टिक खुर्ची वरून पाय खाली ठेवत नाही तोच त्यांना सुद्धा विजेचा धक्का बसून ते सुद्धा खाली पडले. त्यांनी सुरक्षा रक्षकास कळवले असता वॉर्डबॉय धावून येताच त्याला सुद्धा विजेचा शॉक लागला. त्या नंतर मुख्य स्विच बंद केला. परंतु तो पर्यंत धर्मलिंगम यांचा मृत्यू झाला होता. खेडेकर याना भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. धर्मलिंगम हे पालिकेच्या सेवेत होते. निवृत्ती नंतर ते ठेकेदारा मार्फत ठेक्यावर पालिकेत काम करत होते.

तलाठी अभिजित बोडके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत त्याचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे. नया नगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असली तरी या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

महानगरपालिका आणि नगरसेवकांच्या बेजबाबदारपणाचा ठरला बळी

इमारतीचे मजले वाढवण्याच्या कामासाठी वाहन चालकांची पक्की खोली ठेकेदारास सिमेंट ठेवण्यासाठी देऊन वाहन चालकांना मात्र पत्र्याची असुरक्षित खोली बांधून दिली, त्याच बरोबर विजेच्या तारांचे योग्य नियोजन देखील नाही आणि म्हणूनच पाऊस पडून पाणी वाहिल्यामुळे पत्र्याच्या खोलीत विजेचा प्रवाह उतरला आणि त्यामुळेच हा बळी गेला असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितां वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *