संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारचा ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीत जल्लोष करण्यात आला. ढोल-ताश्यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी वाजत गाजत रवींद्र चव्हाण यांची मिरवणूक काढली.
आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वामुळे राजकीय यश मिळाले आहे. कार्यकर्ता, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री अशा क्रमवारीत भाजपाला नेहमीच चढत्या क्रमवारीत सिध्द केले आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री पद मिळवुन रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक नवा मानाचा तुरा खोवला आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होताना डोंबिवलीतील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांना नक्की कॅबिनेटमंत्रीपद मिळेल अशी खात्री डोंबिवलीकरांना होती आणि झालेही तसेच. चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि डोंबिवलीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. संध्याकाळी साधा कार्यकर्ता आणि अनेकांचे लाडके दादा रवींद्र चव्हाण आपल्या दृष्टीपथास कधी मिळेल या प्रश्नांनी अनेकांचे फोन वाजत होते. आणि पाच वाजताच डोंबिवलीच्या सीमेवर कॅबिनेट मंत्रीपद मिळालेला दादा रवींद्र चव्हाण सर्वांना पहावयास मिळताच गुलालाची उधळण आणि पुष्पहार, गुच्छ देणं सुरू झाले. हजारो डोंबिवलीकर घरडा सर्कल ते श्री गणपती मंदिर रॅलीत सामील होत ढोल-ताशा, बँड वाजंत्री रॅलीत नाचगाण्यात दंग झाले होते.
दरम्यान टिळकांचा पुतळ्याला पुष्पहार घालून रवींद्र चव्हाणांनी अभिवादन केले. नंतर श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि दरम्यान गणेश मंदिर संस्थान तर्फे चव्हाणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक नेते तथा पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिकांनी चव्हाणांचे स्वागत व अभिनंदन केले. यावेळी चव्हाण म्हणाले, विकासाची कामे झाली पाहिजेत यासाठी कार्यरत राहीन, नागरिकांच्या हिताचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवेन. यावेळी रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, समाधान तायडे यांसह कार्यकर्त्यानी मंत्री चव्हाण यांचे अभिनंदन केले. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब, पूनम पाटील, सुहासिनी राणे, दिनेश जाधव, मनोज पाटील, मुकुंद पेडणेकर, मंदार टावरे, सुजित महाजन, वर्षा परमार, मनीषा छल्लारे, मयुरेश शिर्के, मितेश पेणकार, मिहीर देसाई, हरीश जावकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते.