संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
वाहतुकीचे नियोजन व्हावे आणि अपघाताची संख्या शून्यावर यावी व वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरिता सामान्य नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी डोंबिवली शहरात ‘वाहतूक स्वयंसेवक’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पने अंतर्गत जो उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्याचे मूळ उद्दिष्ट वाहतूक नियमन व रस्ता सुरक्षा संदर्भात स्थानिक पातळीवर जनजागृती करणे, लोकसहभागातून वाहतूक नियमन करणे, वाहतुकीची शिस्त राबविणे व समाजाभिमुख कार्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी मा. श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा, मा. श्री.उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाहतूक स्वयंसेवक’ ही संकल्पना शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली तर्फे राबविण्यात येत आहे. ‘वाहतूक स्वयंसेवक’ संकल्पने अंतर्गत शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली येथे २२ स्वयंसेवक हे त्यांच्या सुविधे नुसार दोन तास वाहतूक नियमनाकरीता वाहतूक पोलिसांना मदत करणार आहेत.
दिनांक ३०/०६/२०२१ रोजी मा. श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर यांच्या हस्ते डोंबिवलीतील २२ वाहतूक स्वयंसेवकांना ‘वाहतूक स्वयंसेवक’ असे लिहिलेले टी-शर्ट , टोपी व मास्क देण्यात आले असून डोंबिवली शहरात ‘वाहतूक स्वयंसेवक’ ही संकल्पना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
वाहतूक उपशाखा डोंबिवलीचे पोलीस निरीक्षक श्री.उमेश गित्ते यांनी याद्वारे आवाहन केले आहे की, डोंबिवली शहरातील सुजाण नागरिकांनी सदर संकल्पने मध्ये सहभागी होऊन जनजागृती करावी व वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यास सहभागी होऊन मदत करावी.