संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पुण्यातील घटनेत प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ येथे प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तरुणीही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग सुरू केला होता. तरुणापासून आपली जीव वाचवण्यासाठी ती तरुणी वाचवा… वाचवा… असा आक्रोश करुन भररस्त्यात धावत होती. त्याचवेळी, एक युवक जीवाची बाजी लावून पुढे सरसावला आणि आणखी एका तरुणाच्या मदतीने तरुणीचा जीव वाचला. या घटनेनं पुणे शहरासह महाराष्ट्र हादरला आहे. त्यावरुन, आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला आहे. गृहमंत्र्यांना वेळ नाही का? असा सवाल करत अजित पवार यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र सध्या दिसत आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांना बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळायला वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे शहर इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही, अशा शब्दात अजित पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असंही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हटलं.