+
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली असून उमेदवार असलेल्या शशी थरुर यांनी आपल्यासोबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक या महिन्यात होत असून मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोन उमेदवार ही निवडणूक लढवीत आहेत. मात्र आपल्याला प्रदेश प्रतिनिधींच्या याद्याच दिल्या जात नाहीत, दिल्या तर त्यांचे संपर्क क्रमांक दिले जात नाहीत, प्रचाराला गेलो तर प्रदेशाध्यक्ष भेटत नाहीत अशा तक्रारी शशी थरूर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे केल्या आहेत. याउलट खरगे यांना मात्र संपूर्ण सहकार्य केले जाते, पक्षश्रेष्ठींनी कोणालाही पाठिंबा दिला नसताना हा भेदभाव का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मधुसूदन मिस्त्री यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून सर्वांना समान संधी असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रात प्रचाराला आलेल्या शशी थरूर यांना राज्यातील कोणतेही प्रमुख नेते भेटले नाहीत मात्र प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे, आशिष देशमुख, राजन भोसले आदींनी त्यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुले म्हणजे कार्तीक चिदंबरम, संदीप दीक्षित आदी नवपिढी थरुर यांच्या प्रचारासाठी पुढे आली आहे. मात्र पक्षातूनच भेदभाव होत असल्याने ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.