संपादक: मोईन सय्यद / मीरारोड, प्रतिनिधी
कोरोना पॉझिटिव्ह आणि हृदयासंबंधी विकार असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेच्या हृदयातून चक्क ७ सेंटिमीटरची गाठ काढण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चालली. कोरोना संसर्गामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होती त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते. परंतु अशा स्थितीत केवळ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या महिलेला नव्याने आयुष्य मिळाले आहे.
मुळची कोल्हापूरची असणारी योगिता पाटील हिचा नुकताच विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनी तिला अचानक श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय चाचणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. श्वास घेता येत नसल्याने या महिलेला ऑक्सिजनची गरज असल्याने कुटुंबियांनी तिला तातडीने मीरा रोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात हलवले.
मीरा रोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरँसिस सर्जन डॉ. उमेंद्र भालेराव म्हणाले की, “ज्या वेळी या महिलेला रूग्णालयात आणण्यात आले होते तेव्हा या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवत होता आणि पायाला सूज होती. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. अशा स्थितीत डॉ. अनुप टकसांडे यांनी या महिलेची इकोकार्डिओग्राफी तपासणी केली. या चाचणीत महिलेच्या हृदयाच्या उजव्या वरच्या भागात ७ सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची गाठ असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे हृदयाव्दारे शरीरातील अन्य अवयवांना होणाऱ्या रक्तप्रवाहात अडचणी येत होत्या. फुफ्फुसाला योग्यपद्धतीने रक्तपुरवठा होत नव्हता. मायक्सोमा नावाचा हा हृदयाचा ट्यूमर होता. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावू शकतो.”
डॉ. भालेराव पुढे म्हणाले, “कोविड-१९ संसर्ग असल्याने या महिलेवर स्टिरॉइड्स आणि रेमेडसवीरद्वारे उपचार करण्यात आले आणि जेव्हा कोविडचा संसर्ग बरा झाला त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे २१ एप्रिल रोजी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेवर पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले म्हणूनच कोरोनाच्या कालावधीत हृदय व फुफ्फुसासंबंधी काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.”