संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
२२ ऑगस्ट १९४९ रोजी फोर्टच्या तांबे उपाहारगृहात स्व.प्रभाकर पाध्ये व स्व.श्रीकांत पालेकर यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या संमेलनात ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून संस्था सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि वृत्तपत्रलेखनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. ७३ वर्षाच्या या वाटचालीत वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानाने गौरविण्यात येते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सन २०२१ चा पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता धुरू हॉल, दासावा, छबिलदास लेन, दादर-पश्चिम, मुंबई मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्रीराम मांडवकर आणि दत्ताराम गवस यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केले आहे.
मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संघाच्या सभासदांसह वृत्तपत्र लेखकांनी या कार्यक्रमास अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.