पुणे, प्रतिनिधी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली असून या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय आंदोलने करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या स्वतः मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील आंदोलनामध्ये सामील होणार असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा भडका उडवून केंद्र सरकारला कडक शब्दांत जाब विचारावा, असे आवाहनदेखील त्यांनी महिला पदाधिका-यांना केले आहे.
गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास मध्यमवर्गीय गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे, असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल ७० रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागले आहे. त्यामुळे ही अन्याय्य दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
“केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत घरगुती गॅस सिलेंडर च्या किमती सातत्याने वाढविल्या आहेत त्यामुळे मध्यमवर्गीय गृहिणींना त्याचा चांगलाच फटका बसला आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करीत असून जो पर्यंत घरगुती गॅसच्या ह्या वाढलेल्या किमती कमी होणार नाहीत तो पर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार – श्रीमती.पौर्णिमा विष्णू काटकर (प्रदेश सचिव तथा पुणे शहर निरीक्षक, राष्ट्रवादी महिला काँग्रेस)