आपलं शहर

रस्त्यावरील अनधिकृत बस पार्किंगच्या मुद्द्यावर मनसे झाली आक्रमक! कठोर कारवाई करण्याची केली मागणी!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृत बस पार्किंग केल्या जातात. गेल्या आठवड्यात भाईंदर पश्चिम येथील भोला नगरच्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये अपहरण करून एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा निंदनीय प्रकार घडण्याच्या आधी मनसेने अनेक वेळा मिरा भाईंदर शहरात होत असलेल्या अनधिकृत बस पार्किंग विरोधात कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पत्र व्यवहार केला होता जर आधीच कारवाई झाली असती तर असा प्रकार घडला नसता असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून आता तर हा निंदनीय प्रकार घडल्या नंतर मनसे अनधिकृत पार्किंगवर होत असलेल्या कारवाईवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस बोस मैदानाच्या बाजूला आज देखील काही बस पार्क करण्यात आल्याचे समजताच मनसेच्या महिला उपशहर अध्यक्षा सौ.वैशाली येरूणकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ कळविले तसेच मनसेचे कामगार नेते व १४५ विधानसभा अध्यक्ष संदिप राणे, शहर सचिव अनिल रानावडे व महिला उपशहर अध्यक्षा सौ.वैशाली येरूणकर यांनी देखील त्या जागेवर जाऊन वाहतूक पोलिसांना या अनधिकृत बस पार्किंगवर कारवाई करण्यास भाग पाडले. या प्रसंगी विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष करण कांडणगिरे तसेच विनायक यादव, प्रमोद निळेकर, शरद मांडरे इत्यादी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात अशा प्रकारे अनधिकृत बस पार्किंग केल्या जात आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतच आहे परंतु ह्या बसेस मध्ये रात्रीच्या वेळी अनेक गैर प्रकार केले जात असून त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था देखील धोक्यात आली आहे म्हणून ह्या सर्व अनधिकृत बस पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

आता यावर वाहतूक पोलीस विभाग किती गांभीर्याने कारवाई करेल याबद्दल शंका उपस्थित केली जात असून ह्या अनधिकृत बस पार्किंग करणाऱ्या बस मालकांकडून दर महिन्याला हप्ता दिला जातो असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ह्या आरोपात किती तथ्य आहे हे तर नंतर कळेल मात्र रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या बसेस मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर बेशिस्तपणे बसेस पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याच प्रमाणे त्यांना बसेस उभ्या करण्यासाठी वेगळी जागा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *