संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोनाच्या संकटा मुळे राज्य सरकारने जून २०२० पासून ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला. एकीकडे विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सरकारने डिजीटल पद्धतीचा अवलंब स्विकारला. या शिक्षणासाठी मोबाईल आणि संगणकचा वापर वाढला असल्याने डोळ्यांचे आजार वाढत आहेत. लहान मुलांमधील डोळ्याचे आजार वाढू नये यासाठी वेळीच उपचार घ्यावे असा सल्ला प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी यावेळी डोळ्यासंबंधी आजारांवर आणि म्युकर मायकोसीसवर माहिती दिली. त्या म्हणाल्या, सध्या कोविड काळात सर्वच परिस्थिती बदलली आहे. कोविड नियंत्रणात यावा म्हणून शासन-प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन वर्क-फ्रॉम-होम व ऑनलाईन शिक्षण सुरू केले. परंतु याचा परिणाम म्हणून डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे.
सध्या म्युकर मायकोसीस हा रोग जोर धरत असून त्यावर नियंत्रण मिळावे याकरता डोळ्यांची तपासणी तात्काळ करून घेणे हिताचे आहे असे त्यांनी सांगितले. आजकाल काम आणि खेळ दोन्हीसाठी एकच तंत्रज्ञान वापरलं जातं. खेळ असो वा काम समोर एक स्क्रीन असतेच. मग ती मोबाईलची, कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉप, टॅबलेट ची असो. या स्क्रीन वर खूप काळ सातत्याने बघत राहिल्याने डोळ्यांचे विकार बळावतात. स्क्रीनवर एकटक बघत राहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी होवून डोळ्यांवर ताण निर्माण होतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, ताण येणे, डोळे जड होणे, डोकेदुखी असे त्रास होतात. जर ही सवय सोडली नाही तर आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावे लागेल. जर डिजिटल साधने वापरायची असतील तर कमीत कमी एक तासामध्ये तीन वेळा २० सेकंदाच्या ब्रेक घेणे आवश्यक आहे. याबरोबर बैठे काम करतांना बसण्याच्या पध्दतीवर लक्ष ठेवले पाहिजे. सध्या लाईफस्टाइल बदलल्याने कमी वयातही मोतीबिंदूचे रुग्ण दिसून येतात.
म्युकर मायकोसीस प्रकारात प्रथम नाकावाटे विषाणूचा शिरकाव होतो त्यामुळे वेळीच जागरूक राहिले पाहिजे. नाक, डोळे आणि मेंदुवर याचा परिणाम होतो. डोळे सुजणे, नाकातून घाण वास येणे, डोळ्यांची बाजू दुखणे, डोळा पुढे येणे अशी लक्षणे दिसून येतात यासाठी जनजागृती करणे खुप महत्वाचे असून यासाठी आमची तयारी आहे. यासाठी आमच्याकडून शाळांना तसेच शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केला गेला पण त्याकडे दुर्लक्ष झाले याचे आश्चर्य वाटते असेही त्यांनी सांगितले.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारावर वाढ झाली आहे. असे आजर होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर माहिती देण्यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरूर यांनी डोंबिवलीतील शाळांना संपर्क केला होता. लहान मुले आणि पालवर्गासाठी आठवड्यातून एकदा माहितीपर ऑनलाईन जनजागृती करू या. यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारणार नाही असे डॉ.अनघा हेरूर यांनी शाळा व्यवस्थापनांना सांगितले होते. मात्र एकही शाळेने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला नाही अशी खंत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.