संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे, आता लवकरच शाळांची घंटा वाजणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. पहिली ते सातवीचे वर्ग येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरच अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा विचार करूनच शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारने ०१ ऑगस्टला :ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शिक्षण विभागाकडे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, त्यानंतर या निर्णयाची घोषणा होऊ शकते. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.
राज्यात शाळा सुरू करण्याचा विचार सुरू असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि ‘डेल्टा व्हायरस’चा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच उपाययोजना आखण्यात येत आहेत. यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. त्यानंतर, ज्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्याच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनंतरच शाळा सुरू करण्यात येतील, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
राज्यात शाळा सुरू करण्याची घाई नको, त्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल, असे आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. परदेशात आणखी नवीन स्ट्रेन सापडले आहेत, त्यातच महाराष्ट्रात कोविडच्या केसेस अधिक आहेत. दुसरीकडे लहान मुलांवर लसीकरण ट्रायल सुरू आहे. त्यामुळे, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे, शाळेची घंटा वाजायला आणखी अवधी असणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.