संपादक: मोईन सय्यद/मीरारोड प्रतिनिधि
मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात कोविड-१९ ची हलक्या-मध्यम स्वरूपातील लक्षणं असणाऱ्या रूग्णांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार दिले जात आहे. त्यानुसार कोविड-१९ विषाणूची लागण झालेल्या दोन रूग्णांवर ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपीद्वारे उपचार करण्यात आले असून उत्तर मुंबईत पहिल्यांदाच कोरोना रूग्णांवर या नवीन उपचारपध्दतीने या संसर्गावर मात करण्यात आली आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांसाठी अँटीबॉडी कॉकटेल उपचारांना भारतात मंजुरी देण्यात आली होती. अशाच अँटीबॉडी कॉकटेल उपचारपध्दतीचा डोस अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला. त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानुसार आता वॉक्हार्ट रूग्णालयात कोरोना रूग्णांवर या उपचारपद्धतीचा वापर करण्यात येत आहे.
६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दोन्ही कोरोना रूग्णांना मे महिन्यात उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्हीही रूग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा त्रास होता. या रूग्णांवर अँटीबॉडी कॉकटेल थेरपीद्वारे उपचार करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यानुसार कुटुंबियांची परवानगी घेऊन उपचार करण्यात आले आहे. या थेरपीनंतर रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. लवकर दोन्ही रूग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांसाठी आता ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपी एक प्रभावी उपचार ठरत आहे.
मीरारोड येथील वोकहार्ट हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजिशियन डॉ. जिनेंद्र जैन म्हणाले, “ ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कोरोना रूग्णांना ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ ही थेरपी देण्यात येत आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी (एसओपी २) ९३ टक्के आहे पंरतू ते आँक्सिजन सपोर्टवर नाहीत परंतू त्यांना अन्य लठ्ठपणा, मधुमेह, यकृताचे आजार, हृदयरोग आणि फुफ्फुसाचे आजार असल्यास संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. तसेच, अतिगंभीर स्वरूपाच्या कोरोनाबाधित रूग्ण आणि एखादी अँलर्जी असणाऱ्या रूग्णांना या थेरपीची शिफारस केली जात नाही ”
डॉ. जैन पुढे म्हणाले, “’मोनोक्लोनल अँटीबॉडी’ हे कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मामधून काढलेले आहे. रुग्णांना ‘कासिरिविमॅब’ (६०० एमजी) आणि ‘इम्डेविमॅब’ (६०० एमजी) या दोन्ही औषधांचे गुण असलेलं औषध दिले जाते. हे औषध इंजेक्शनद्वारे दिले जाते. अँटीबॉडी कॉकटेलची संपूर्ण डोस 30 मिनिटांत रुग्णाला दिली जाते. त्यानंतर एक तास रूग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येते. या औषधांमुळे कोरोना रूग्णांच्या प्रकृतीत पटकन सुधारणा होत आहे.”
“कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आता वॉक्हार्ट रूग्णालयात ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ ही थेरपी सुरू करण्यात आली आहे. ही थेरपी विषाणूची तीव्रता कमी करण्यास आणि उच्च-जोखीम रूग्णांची प्रकृती खालावण्यापूर्वी त्यांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आम्ही जास्तीत जास्त रूग्णांना ही थेरपी घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, ”असे डॉ. जिनेंद्र जैन म्हणाले.