संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे. राणांना कालच जामीन मिळाला असून त्यावेळी न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे. राणांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. पोलीसांनी नोटीस दिल्यानंतर ते घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे.
राणा दाम्पत्याला जामीन देताना न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिलेल्या निकालात न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई पोलीसांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजद्रोहाचा थेट आरोप एखाद्यावर दाखल करणं चुकीचं आहे. कारण राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचं जे आंदोलन पुकारलं होतं, ते आंदोलन करू नये यासाठी मुंबई पोलीसांनी त्यांना नोटीस दिली होती. या नोटिसीनंतर राणा दाम्पत्याने आपलं आंदोलन मागे घेतलं असून ते दोघेही आपल्या खार इथल्या निवासस्थानातून बाहेर पडले नव्हते. त्यानंतर मुंबई पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा ठपका मुंबई सत्र न्यायालयाने ठेवला आहे.