संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील एका व्याख्यानादरम्यान चाकूने भोसकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमधील इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दींना धक्काबुक्की केली आणि हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना हवाई ऍम्ब्युलन्स ने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. दरम्यान, सलमान रश्दी यांना ‘द सैटेनिक वर्सेस’ या पुस्तकाच्या लेखनावरून जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्यावर तब्बल ३३ वर्षांनी हल्ला करण्यात आला.
मुंबईत जन्मलेले आणि बुकर पारितोषिक विजेते सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कारण अनेक मुस्लिम धर्मीय याला निंदा मानतात. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा काढला होता. रश्दींची हत्या करणाऱ्याला ३ मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
रिपोर्ट्सनुसार, रश्दी लेक्चर देण्यासाठी स्टेजवर पोहोचताच एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीच्या हातात चाकूसारखे धारदार शस्त्र असल्याची माहिती समोर आली आहे. धक्काबुक्की केल्यानंतर त्याने रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर रश्दी यांना एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून हल्ल्यामागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.