संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली येथे गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात वाजतगाजत घराघरात दाखल झालेल्या गणरायाला दिड दिवसांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र विसर्जन स्थळी कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वाणवा असल्याने विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी विसर्जन व्यवस्थित व्हावे यासाठी काळजी घेत असल्याचे चित्र दिसत होते. डोंबिवलीत विविध विसर्जन स्थळी सायंकाळ पर्यंत ७५५० घरगुती तर २ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ठाकुर्ली येथील शिवसेना शाखेच्या वतीने चोळे विसर्जन स्थळी गणेश भक्तांना सहकार्य करण्यात येत होते.
यंदा सगळे निर्बंध हटविण्यात आल्याने डोंबिवलीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. काल सायंकाळी बेंजो, ढोल ताश्याच्या जल्लोषात, गुलाल उधळीत दिड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. डोंबिवली चोळे गाव येथे पारंपरिक पद्धतीने तलावात विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल दिसून येत होता. येथे कुत्रिम विसर्जन साठी पालीकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. मात्र गणेश भक्त तलावात विसर्जन करण्यास पसंती देत होते. दरवर्षी तलावाभोवती गणेश भक्तांची गर्दी होउन गोंधळ उडत असल्याने यंदा तलावाजवळ गणेश मूर्ती सोबत फक्त दोनच गणेश भक्तांना पोलीस परवानगी देत होते. त्यामुळे पोलीसांना गणेश भक्तांची समजूत काढतांना नाकीनऊ होत होते. तर विसर्जनासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ थोपविण्यासाठी पोलीसांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत होते.
शिवसेनेचे ठाकुर्ली येथील शाखाप्रमुख सचिन जोशी आणि त्यांचे बंधू चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी आणि त्यांचे कार्यकर्ते गणेश भक्तांना सहकार्य करीत होते. तलावात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने तलावाचे पाणी अतिशय खराब अवस्थेत आहे. पालिकेचे लक्ष वेधून सुध्दा पालिका लक्ष देत नसल्याची तक्रार सचिन जोशी यांनी केली.
मोठा गाव रेती बंदर येथे दिड दिवसांच्या गणेश मूर्ती सोबत वाहनातून आलेल्या जेष्ठ नागरिकांना विसर्जन स्थळापासून दिड किमी अंतरावर रोखण्यात आल्याने त्यांनी माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे युवा जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांना तक्रार केली. दिपेश म्हात्रे यांनी तातडीने बंदी हटविण्याची विनंती पोलिसांना केली. यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळाला. मोठागाव येथे देखील दरवर्षी प्रमाणे गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालीकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी योग्य नियोजन करत सहाय्यक पोलीस उपयुक्त सुनील कुराडे यांच्या सोबत काल संध्याकाळी पाहणी करुन योग्य सूचना दिल्या.