संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोना परिस्थिती नियंत्रणात असलेल्या गावांमध्ये शाळा सुरु व्हावी अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर शिक्षण विभागाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून शासनाच्या नियम आणि अटींसह शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे काही ठिकाणी शाळा सुरु करण्याचा प्रयत्न झाला. पण दुसरी लाट आल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. आता आमचे संपूर्ण लक्ष हे येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर आहे. कोरोना काळात मुलांवर परिणाम होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. शाळा सुरु होणार असल्या तरी त्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमात बसणाऱ्या ठिकाणच्या शाळाच सुरु होऊ शकणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करताना काही सूचना देण्यात आल्या आहेत.
त्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
ज्या गावात एक महिन्यापासून कोरोना नसेल व कोरोना संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृकता असेल त्यात परिस्थिती अनुकूल असेल तर गाव पातळीवरील समिती म्हणजेच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या माध्यमातून निर्णय
गावात भविष्यात देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची योजना असेल अशा ठिकाणी शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
१५ जुलैपासून महिनाभर कोरोना नसलेल्या आणि शासनाने दिलेल्या नियमानुसार ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. शासनाने दिलेल्या एसओपीची अंमलबजावणी याठिकाणी व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.
काही गाव आणि शहरांमध्ये कनेक्टीव्हीटी किंवा इलेक्ट्रीसिटी नसल्याने डिजीटल शिक्षण देण्यात अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना त्रास सहन करावा लागला. अशा ठिकाणी देखील नियमांचे पालन करुन ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला. कोविडमुक्त गावातील शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने ५ जुलैला परिपत्रक जाहीर केले होते. या परिपत्रकानुसार आखून दिलेले नियम शाळांना पाळणे बंधनकारक आहे.