Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका!

कोणतीही करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्याची काँग्रेसची मागणी

भाईंदर: सध्या मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे, उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट न करता त्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना केली आहे.

कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध नसताना शहरातील नागरिकांवर विविध मार्गांनी कर लादले आहेत तर नव्याने 10 टक्के रस्ता कर लागू करण्यासाठी प्रशासकीय निर्णय घेतल्याने त्याला काँग्रेस पक्षाने यापूर्वीच विरोध केला आहे. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासक या नात्याने आयुक्तच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शिंदे- फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, वॉर्ड रचना, नगरसेवक संख्या, पॅनल पद्धत आदींचे कारण देत प्रकरण न्यायप्रविष्ठ करीत प्रलंबित ठेवल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट किती असावी याचीही कालमर्यादा हवी असे नागणे म्हणाले.

महासभा घेण्याचा अधिकार महापौरांना असतो तर धोरणात्मक निर्णय, धोरण ठरविण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना असला तरी प्रशासक या नात्याने राज्यशासनाने आयुक्तांना बहाल केलेले अधिकार तसेच प्रशासकीय राजवटीत आजतागायत किती सभा घेतल्या व प्रशासकीय ठराव केले याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात प्रशासनाकडे मागितली असल्याचे काँग्रेस प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी सांगितले.

येणाऱ्या काही दिवसांत मिरा भाईंदर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारच्या नवीन कर वाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला काँग्रेस पक्षातर्फे विरोध केला जाईल असे स्पष्ट मत काँग्रेसचे मिरा भाईंदर शहाराराचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी व्यक्त केले आहे!

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *