संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था’ ही जागतिक स्तरावर आर्थिक बाबींचा अभ्यास तसेच आर्थिक स्थैर्य व वाढीकरिता नियोजन करणारी प्रमुख संस्था असून याआधी संस्थेने आर्थिक मंदीचा इशारा जगातील प्रमुख देशांना दिला होता. नुकतीच आर्थिक दरवाढीची वर्ष २०२२-२३ करिता आकडेवारी कमी करताना संस्थेने ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा पुन्हा एकदा जगाला दिला आहे. ‘आयएमएफ’ च्या ताज्या आकडेवारीनुसार वर्ष २०२६ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसणार असून ती ४ लक्ष कोटी डॉलरने कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने मोठे आर्थिक संकट जगासमोर उभे राहणार असल्याने जगातील सर्व देशांनी आर्थिक धोरण तयार करण्याचे आवाहन आयएमएफ द्वारे करण्यात आले आहे.
जॉर्जटाऊन विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ‘आयएमएफ’ च्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली लवकरच जाण्याकडे वाटचाल करत असून यामुळे जगाची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते. यामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण होऊन आर्थिक संतुलन बिघडू शकते. याचा परिणाम म्हणजे मोठे आर्थिक आव्हाने उभे राहणार असल्याने आतापासून प्रमुख देशांनी आर्थिक धोरण राबविणे गरजेचे आहे. हा इशारा जगातील प्रत्येक छोट्या-मोठ्या देशांकरिता असून, मंदीतून सावरण्यासाठी आतापासून प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, सर्व आर्थिक बाबी बिघाडीतलच व सर्व कोलमडेल असे नाही काही गोष्टी या चांगल्या देखील होतील परंतु गंभीर आर्थिक संकटांसोबत लढण्याची स्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी नियोजन व आर्थिक धोरण आवश्यक असल्याने या बाबीवर भर देणे गरजेचे आहे. ‘आयएमएफ’ ने यापूर्वी वर्ष २०२२ करिता आर्थिक वाढीचा दर ३.२ टक्के इतका असेल असे म्हटले होते परंतु तो कमी होऊन वर्षाअखेर २.९ टक्क्यांवर येण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.