संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला, मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागानं पाठवलंय. त्यामुळे मुंबईत आपल्या मराठी भाषेला बेघर होण्याची वेळ आल्याचा महत्त्वाचा विषय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सभागृहात मांडला.
दरम्यान, मराठी भाषा विकास संस्थेच्या कार्यालयाची जागा यापुढेही त्यांच्याकडे कायम राहील, हे सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी अजित पवारांनी यावेळी केली. त्यावर ही जागा मराठी विकास संस्थेकडे कायम राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईतील ‘एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या आवारात पहिल्या मजल्यावर मराठी विकास संस्थेची जागा आहे. मात्र ती जागा सोडण्याचे पत्र आल्याने मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या विकास संस्थेला मुंबईतच बेघर व्हायची वेळ आली होती. सरकारकडून पुरवणी मागण्या, गुजराती, सिंधी भाषांसाठी निधीची तरतूद केली, आम्ही सर्वांनी त्याचे स्वागत केले. महाराष्ट्रात मराठी भाषेचा विकास व्हावा, अशी अपेक्षा आम्ही त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानुसार मराठी भाषा संस्थेची जागा कायम ठेवण्याचे आदेश करण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.
त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही जागा मराठी भाषा विभागाकडेच राहणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संस्थेच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कौशल्य विकास विभागाने जागा रिकामी करण्याचे पत्र परस्पर कसे दिले ? याची चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.