संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
गेल्या काही दिवसांत महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महागाईवर मात करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खाद्य तेल कंपन्यांना प्रतिलिटर तेलाचे दहा रुपयांपर्यंत दर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारचे तेल कंपन्यांना कडक निर्देश
खाद्यतेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. देशभरातील एकाच ब्रँडच्या खाद्यतेलाची एमआरपी समान ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. खाद्य तेल कंपन्यांना किरकोळ किमती कमी करण्यास सांगण्यासाठी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने बुधवारी बैठक घेतली.
जगभरात स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती घसरल्या असतानाही देशात चढा भाव आकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना जागतिक किंमतीतील दर कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. भारत दरवर्षी आपल्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेच्या ६० टक्के आयात करतो.
‘सॉल्व्हेंट असोसिएशन ऑफ इंडिया’चे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी म्हटले आहे की, जागतिक स्तरावर किंमत ३००-४०० डॉलर प्रति टन कमी झाली आहे. पण त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. येत्या काही दिवसांत भारतात खाद्यतेलाच्या किंमतीही घसरतील असे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी बुधवारी मंत्रालयाने घेतलेल्या बैठकीत सांगितले.