संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने धर्मांतराच्या घटना घडत असल्याने राज्यात कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त आयोजित पत्रकार परिषदेला बोलत होते.
पालघर जिल्ह्यातील डहाणू पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातही आदिवासी महिलेच्या धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नुकताच संभाजीनगर येथेही एक पाद्री ‘चंगाई सभे’त गंभीर आजार बरे करण्याचा दावा उघडपणे करतांना दिसून आला. धर्मांतराचा प्रयत्न होत असलेल्या घटना या केवळ हिमनगाचे टोक असून राज्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने धर्मांतराच्या घटना घडत आहेत. यापूर्वी राज्यात काँग्रेसी शासन असतांना महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांच्या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने २९ नोव्हेंबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र शासनाला ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करण्याची शिफारस केली होती. या शिफारसीनुसार शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी आणि राज्यात कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे घनवट यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘लंगडा चालू लागेल’, ‘आंधळ्याला दिसू लागेल’, ‘बहिरा ऐकू लागेल’ आदी धादांत अंधश्रद्धेचा खोटा प्रचार करणार्या ‘चंगाई सभां’चा राज्यात सुळसुळाट झाला आहे. या सभांतून गोरगरीब हिंदूंना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित केले जाते. फरार आतंकवादी डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या रिझवान खान आणि अर्शद कुरेशी यांना काही वर्षांपूर्वी कल्याण येथून अटक केली होती. या दोघांनी सुमारे ७०० हिंदूंचे फसवून अन् प्रलोभनाद्वारे इस्लाममध्ये धर्मांतर केले होते, असे आतंकवादविरोधी पथकाच्या तपासात आढळून आले होते.
देशात प्रतीवर्षी १० लाख हिंदू धर्मांतरीत होत आहेत. हिंदूंचे धर्मांतरण हे एक मोठे राष्ट्रविरोधी षड्यंत्र आहे. नागालँड, मिझोराम, मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत. भारतात हिंदु ९ राज्यांमध्ये अल्पसंख्य झाले आहेत. यातील काही राज्यांत ‘स्वतंत्र देश’ घोषित करण्याच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ असल्याचे म्हटले होते, याचा प्रत्यय या घटनांतून येत आहे.
नुकतेच पुणे जिल्ह्यातून ८४० महिला-मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’नुसार वर्ष २०१८ मध्ये महाराष्ट्रातून १८,९०१ महिला-मुली बेपत्ता झाल्या होत्या. या मुली जातात कुठे ? ‘लव्ह-जिहाद’ मध्ये अडकतात, आखाती देशांत विकल्या जातात, लग्नाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसायात पाठवल्या जातात कि आणखी काय होते, याचा छडा लागायला हवा. याच संदर्भात तत्कालीन नि. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने मध्यप्रदेश आणि ओडिसा राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अशी शिफारस शासनाला केली होती. आजघडीला देशात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अरूणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, ओडिसा, झारखंड, कर्नाटक या १० राज्यांनी ‘धर्मांतरबंदी कायदा’ केला आहे. गोव्यातही तशी शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी श्री. घनवट यांनी या वेळी केली.