मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील घोडबंदर रोड येथे शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य ३० फूट उंचीच्या पुतळा उभारणीच्या कामाच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत विरोध करणाऱ्या भाजपा नगरसेवक दिनेश जैन यांना स्थायी समिती सभापती पदाची भाजपा कडून बक्षिसी देण्यात आल्याची चर्चा शहरात केली जात असून अनेक राजकीय नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिनेश जैन हे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक असून आज स्थायी समितीच्या निवडणुकीत त्यांची सभापती पदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या सोमवारी 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत घोडबंदर ते जेसल पार्क या 60 मीटर रस्त्याच्या चौकात राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 येथे शहराच्या प्रवेशद्वारावर 2 कोटी 95 रुपये खर्च करून ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता परंतु भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य दिनेश जैन यांनी कोणतेही कारण नसताना सुधारित निविदा सादर करावी असा ठराव मांडून या प्रस्तावाला विरोध केला आणि सत्ताधारी भाजपने बहुमताने सदर निविदा मंजुरीचा प्रस्ताव रद्द केला.
भाजप नगरसेवक दिनेश जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला विरोध केल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति आदर हे फक्त निवडणुकी पुरते दिखाऊ असते मुळात भाजपच्या नेत्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल अजिबात आदर नाही त्यासाठी आता शहरातील जनताच त्यांना योग्य उत्तर देईल दिनेश जैन यांनी आपल्या टक्केवारीसाठीच या प्रस्तावाला विरोध केला आहे अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे.
28 फेब्रुवारी रोजी तत्कालीन सभापती अशोक तिवारी यांचा एक वर्षाचा कालावधी संपणार असून नवीन सभापती पदासाठी भाजप तर्फे दिनेश जैन, राकेश शहा आणि सुरेश खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती तर शिवसेने तर्फे कमलेश भोईर एकमेव उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे भाजप विरुद्ध भाजप अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपचे संख्याबळ पाहता स्थायी समितीचा सभापती त्यांचाच होणार हे जवळपास निश्चित असले तरी सद्ध्या भाजप मध्ये दोन गट सक्रिय असून भाजपच्या निष्ठावंतांचा ए ग्रुप आणि माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांचा बी ग्रुप झालेले आहेत. नरेंद्र मेहता गटाचे राकेश शहा आणि दिनेश जैन हे दोन उमेदवार स्थायी समितीच्या सभापती पदासाठी उमेदवार होते तर त्यांच्या विरोधी बी गटातील सुरेश खंडेलवाल हे देखील सभापती पदाच्या शर्यतीत उतरले होते.
नरेंद्र मेहातांच्या विरोधी गटातील भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आणि रवी व्यास यांनी सुरेश खंडेलवाल यांना स्थायी समितीच्या सभापती पदासाठी आपला उमेदवार घोषित केल्याने बहुमताने सुरेश खंडेलवाल यांची निवड होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती आणि त्या निमित्ताने भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे सोबतच विरोधी गटाचे नेतृत्व करणारे रवी व्यास यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाची हीच खरी कसोटी लागणार होती परंतु नरेंद्र मेहता गटाचे दिनेश जैन यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याने रवी व्यास आणि हेमंत म्हात्रे यांना एक प्रकारे मोठा धक्काच बसला असल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तूळात केली जात आहे.
स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत माजी आमदार नरेंद्र मेहता गटाची पुन्हा एकदा सरशी झाली असून मीरा-भाईंदर शहरात भारतीय जनता पक्षावर अजूनही नरेंद्र मेहता यांचेच वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करून दिनेश जैन यांनी निविदेचा प्रस्ताव रद्द केला आणि त्याचेच बक्षीस म्हणून त्यांना स्थायी समितीचे सभापती पद दिल्याची प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणामुळे आता शहरातील राजकारण चांगलेच तापले असून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या भाजप विरोधात जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. आता यापुढे हे प्रकरण काय वळण घेते आणि त्यामुळे शहराच्या राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“भाजपचे नगरसेवक दिनेश जैन यांना ठाऊक होते की पुढचे स्थायी समितीचे सभापती तेच होणार आहेत आणि म्हणून 2 कोटी 95 लाखाची ही निविदा आपल्या कार्यकाळात मंजूर करून घ्यावी आणि त्याची टक्केवारी आपल्यालाच मिळावी या उद्देशाने दिनेश जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत!” – प्रवीण पाटील (विरोधी पक्षनेते, शिवसेना)