भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिकेचा कालावधी संपलेला असून महासभा आणि स्थायी समिती अस्तित्वात नसताना महापालिकेवर प्रशासक म्हणून कार्यरत असलेले दिलीप ढोले यांनी आपल्या मनमर्जीने सर्वसामान्य जनतेवर नव्याने ‘रस्ता कर’ लावण्याचा निर्णय घेतला आहे तो अयोग्य असून करदात्या नागरिकांवर नवा आर्थिक भुर्दंड लावणे अयोग्य असल्याचे सांगत रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवक पदाचा कालावधी संपल्याने राज्यशासनाने प्रशासकीय राजवट लावली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात अनिश्चितता आहे, त्यात प्रशासकीय राजवटीत प्रशासक या नात्याने आयुक्तांकडून करवाढी सारखे जन विरोधी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप नागणे यांनी केला आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून कित्येक भागात सुविधा न देता अनेक वर्षांपासून मलप्रवाह कर वसूल केला जात आहे, त्यात शहरातील मलनिस्सारण केंद्र प्रक्रिया अभावी (एस. टी. पी. प्लांट) बंद अवस्थेत आहेत. याबाबतीत जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्तांना निवेदनही दिले होते, युवक काँग्रेसने जन आंदोलन करून सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तरीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागणे यांनी केला आहे.
दरम्यान राज्यसरकार व पालिकेचा असे दोन दोन प्रकारचे शिक्षण कर वसूल करूनही पालिका शिक्षणाचा दर्जा सुधारलेला नाही. सुविधा देणार नसाल तर मग जनतेने कर का भरावेत असा सवाल नागणे यांनी केला आहे. शहरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांची वाट लागलेली असताना रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली दर महिन्याला लाखो रुपयांची टेंडर काढून उधळपट्टी केली जात आहे.
या प्रशासक दिलीप ढोले यांनी तात्काळ हा निर्णय रद्द न केल्यास शहरातील जनतेवर लादण्यात येणाऱ्या या अन्याय्य रस्ता कर (रोड टॅक्स) आकारणी विरोधात मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा मिरा भाईंदर शहरातील काँग्रेस पक्षाने दिला आहे.