संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले नगरमध्ये नाल्याचे काम होत नसल्याने कंटाळून शेवटी भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात उतरून आंदोलन केले. नाल्याचे काम न झाल्याने पाणी तुंबून परिसरातील नागरिकांच्या घरात जाते. याचा त्रास नागरिकांना होत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती एकदम वाईट असते, वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकारी सुशील पायल आणि स्थानिक काही नागरिक नाल्यात उतरले, नाल्यात बसून अनोखे आंदोलन करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ‘अ’ प्रभागक्षेत्र हद्दीतील वार्ड क्र.१३ मोहने गावठाण परिसरात बहुचर्चित नाल्याचे रखडलेले काम अनेक वर्षांपासून होत नसल्याने भाजपचे मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशिलकुमार पायल यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा नाले गटाराचे काम मार्गी लागत नसल्याने २१ जून रोजी नाल्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्राव्दारे दिला होता. पालिकेला इशारा देऊन सुद्धा याची दखल न घेता नाल्याचे काम सुरु न झाल्याने अखेर आज सुशील पायल यांनी स्थानिकांसमवेत याठिकाणी नाल्यात बसून आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान त्या नाल्याचे काम सुरु झाले होते. मात्र त्याठिकाणी काही लोकांनी जागेसंदर्भात हरकती घेतल्या, सध्या प्रक्रिया सुरु असून जागेचा वाद मिटल्यानंतर नाल्याचे काम पूर्ण केले जाईल अशी प्रतिक्रिया महापालिकेचे ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.