मिरा भाईंदर, प्रतिनिधी : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला स्पष्ट बहुमत मिळून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुत्सदी राजकीय डावपेचा समोर भाजप अगदी हतबल झाली आणि महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष यांनी मिळून महा विकास आघाडीची स्थापना करून भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली. महाराष्ट्रातील सत्तास्थाने आता बदलली असून भाजपाची सत्ता जाऊन महा आघाडीची सत्ता आली आणि त्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय “घर वापसी” सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
२०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस सारख्या अनेक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेले होते परंतु भाजपच्या कार्यप्रणालीमुळे त्या सर्वांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत असून त्यामुळे आता या सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एका अर्थाने त्यांची “घर वापसी” सुरु झाली आहे. अशाच प्रकारचे चित्र मिरा भाईंदर शहरात देखील पाहायला मिळत असून मूळचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलेले आणि शिवसेनेत गेलेले मेनेंजीस सातनं यांनी आज ०३ जानेवारी रोजी आपल्या शेकडों समर्थकांसह काँग्रेस पक्षात पुर्नप्रवेश केला.
आपल्याला काही तरी मिळावे अशी अपेक्षा ठेऊन पक्षात येणाऱ्यांनी प्रथम समाज कार्याच्या माध्यमातून जनसमस्या सोडवत लोकांना जोडण्याचे काम करावे, तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळणारच आहे कोणीही थांबवू शकत नाही त्यासाठी मेहनत महत्वाची आहे, कार्यकर्त्यां मधूनच नेते घडत असतात, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विचारधारेला पायदळी तुडवत इतर पक्षात जाणाऱ्याना जनता लक्षात ठेवते, त्यामुळे कर्म करीत रहा फळाची अपेक्षा करीत बसू नका असा सल्ला यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
काशीमिरा हायवे पट्यातील शिवसेनेचे धडाडीचे सक्रीय नेते मेंनेंजीस सातन यांनी मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत शेकडो महिला- पुरुष कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. नयानगर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हुसेन बोलत होते, ते पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आग्रही राहून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या तर जनता तुम्हाला दुवा देत ती जोडली जाईल, आज सातन यांचे समाज कार्य उल्लेखनीय आहे, कोणत्याही पदावर नसताना देखील अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची तळमळ,जिद्द दिसून येते.
शिवसेनेत राहून जनतेची कामे होत नाहीत त्यामुळे आम्ही शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे सांगत या शहराचा सर्वांगीण विकास काँग्रेस काळात झाला असून आमच्या परिसरातील समस्या सर्व प्रथम मुझफ्फर भाऊ व माजी महापौर तुळशीदास म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सोडविल्या गेल्याने काँग्रेस सर्व धर्म समभाव मानत सर्वांना बरोबर घेऊन काम करते म्हणून पक्षात परत आलो अशी प्रतिक्रिया मेनेंजीस सातनं यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत,नगरसेवक अनिल सावंत, अश्रफ शेख, गीता परदेशी, रुबिना शेख,एस. ए. खान, महिला अध्यक्ष लीलाताई पाटील, युवक अध्यक्ष दीप काकडे, प्रवक्ते प्रकाश नागणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांत मिरा भाईंदर शहरातील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्षाने आता कात टाकायला सुरुवात केल्याचे दिसून येत असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश केला जात आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला नवीन उभारी मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.