संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिनांक २० ऑगस्ट २०२१ ला डॉ.नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या निर्घुण खूनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर त्यांच्या खूनाच्या सूत्रधारांच काय झाल ? त्यांना कधी पकडणार ? असा प्रश्न महाराष्ट्र अंनिस तर्फे शासनाला प्रसिद्धी पत्रकाचा द्वारे विचारण्यात आला आहे या मध्ये पुढे असे नमूद केले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉक्टर विरेन्द्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे.
अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध देखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास डॉक्टर वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास होऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही असे मत प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केले आहे.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम गोविंद पानसरे, प्रा कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत, तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरलेली आहेत. बंगळुरू येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालनुसार डॉ. दाभोलकर व कॉ पानसर यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार कॉ पानसरे यांच्या खुनासाठी वापरलेले एक पिस्तुल प्रा कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठी देखील वापरले आहे. या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी २०२० मध्ये झालेली आहे. कर्नाटक एसआयटी ने झारखंड या राज्यातून ऋषिकेश देवडीकर या गौरी लंकेश खुनातील संशयित आरोपीला अटक केलेली आहे. तो तेथे पेट्रोल पंपावर काम करत होता, यावरून हे खून करणार्या गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात येईल. सीबीआय ने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सदर खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ गोविंद पानसरे, प्रा कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आलेला आहे व त्यातून हे स्पष्ट झाले आहे की ही फक्त खुनाची घटना नसून हे दहशतवादी कृत्य आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना Unlawful Activities Prevention Act 1967 हा कायदा लावण्यात आलेला आहे.
डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख करावी यासाठी दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील ह्या कटाचे सूत्रधार लवकरात लवकर पकडले जावे अशी अपेक्षा वेळोवेळी तपास यंत्रणाच्या कडून व्यक्त केली आहे. ह्या केस मध्ये ऍड अभय नेवगी हे दाभोलकर व पानसरे कुटुंबियांचे वकील आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतरदेखील त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे व विवेकी समाजनिर्मितीचे काम जोमाने सुरू आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व इतर समविचारी नागरीक हे काम निष्ठेने व जोमाने पुढे नेत आहेत. रिंगण नाट्य, मानस मैत्री, जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या निर्मितीचा लढा, जात पंचायतीच्या मनमानीविरोधातील आंदोलन, विवेकवाहिनी अशा अनेक अंगांनी हे काम विकसित होत आहे. माणूस मारून विचार संपत नाही अशा ठाम विश्वासातून हे काम पुढे जात आहे. गेली आठ वर्षे २० ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्यकर्ते व समविचारी संघटनातील साथी एकत्र येऊन संपूर्ण देशभर ठिकठिकाणी डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनाचा निषेध करतात तसेच हे काम जोमाने पुढे घेऊन जाण्याचा निर्धार देखील व्यक्त करतात.
राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून २० ऑगस्ट रोजी देशात ठिकठिकाणी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. ह्या वर्षी देखील दिल्ली,आसाम, मध्यप्रदेश, हरियाना, पंजाब, झारखंड, हिमाचलप्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ ह्या राज्यांच्या मध्ये हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पुणे येथे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृतिव्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘द हिंदू’ या वृत्त पत्राचे माजी संपादक पी साईनाथ या स्मृतिव्याख्यानासाठी वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते ‘भारतीय लोकतंत्र और विवेकवादी शक्तियों के सम्मुख चुनौतियां’ या विषयवार विचार मांडणार आहेत. कोरोना संकटामुळे सदर स्मृतिव्याख्यान हे ऑनलाईन आयोजित करण्यात आलेले आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ या ट्रस्टचे अध्यक्ष मा. प्रताप पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असतील. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, नरेंद्र दाभोलकर थॉट्स, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र फेसबुकपेजवरून सदर व्याख्यानाचे लाईव्ह प्रसारण केले जाईल. तरी सर्वांनी आवर्जून या अभिवादन व निर्धाराच्या कार्यक्रमात सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अंनिस मार्फत करण्यात येत आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताह
(दि. १४ ते २० ऑगस्ट २०२१) रोज संध्याकाळी ६ वाजता
१. शनिवार दि. १४ ऑगस्ट:अंध रूढींच्या बेड्या तोडा अभियान जाहीर मुलाखत
मा. नंदिनी जाधव पुणे (२०० महिलांच्या जटा निर्मूलन करणाऱ्या अंनिसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या)
प्रमुख पाहुण्या : मुक्ता बर्वे (सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री)
२. रविवार दि.१५ ऑगस्ट: हिंसा के खिलाफ.. मानवता की ओर.. जाहीर मुलाखत: मा. अंशुल छत्रपती, सिरसा, हरियाणा,(अंशुल यांचे वडील शहीद पत्रकार रामचंद्र छत्रपती यांचा खून बाबा राम रहीमच्या भक्तांनी केला होता, त्या विरोधात अंशुल यांनी अनेक वर्षे निर्भीडपणे खटला लढविला. या खून प्रकरणात बाबा राम रहीमला सजा सुनावली गेली.)
३. सोमवार, दि. १६ ऑगस्ट: जाहीर व्याख्यानसामाजिक चळवळी आणि माध्यमे वक्ते : श्री संजय आवटे
४. मंगळवार, दि. १७ ऑगस्ट: बालसाहित्याच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा:प्रमुख पाहुणे : सुशील शुक्ल,संचालक संपादक, इकतारा बालसाहित्य प्रकाशन संस्था, इंदौर,हस्ते: आलोक राजवाडे, पुणे सुप्रसिध्द युवा सिने अभिनेता आणि दिग्दर्शक लेखक – प. रा.आर्डे, कुमार मंडपे, नीलम माणगावे, चंद्रसेन टिळेकर, चित्रकार – ओंकार मरकाळे
५. बुधवार दि. १८ ऑगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन कार्यक्रम,राष्ट्रीय परिसंवाद: अध्यक्ष : डॉ. विवेक मॉन्टेरो, (ऑल इंडिया पिपल्स सायन्स नेटवर्क), सहभाग: पंजाब, केरळ, तामिळनाडू, प.बंगाल, आसाम या राज्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनावर कार्य करणाऱ्या संघटनाचे प्रतिनिधी
६. गुरुवार दि. १९ ऑगस्ट २०२१, सकाळी १० ते दुपारी ४ वा पर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार संमेलन, भोर, जि. पुणे उपस्थिती : डॉ. शैलाताई दाभोलकर, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, विनोद शिरसाठ, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, डॅनियल मस्करनीस
सात दिवस सहभागी होण्यासाठी एकच झूम लिंक :
https://us02web.zoom.us/j/82993944572?pwd=WGlmYzZHNUlTUTRickRaR3ZSSkptUT09
Zoom ID: 829 9394 4572
Passcode: Mani