संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पश्चिम येथील पंडित दीनदयाळ रोड वरील ‘सम्राट चौकात’ यंदा दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर सगळे निर्बंध उठल्यावर झालेल्या दहीकाला उत्सवात यंदा माजी नगरसेवक व युवा नेता ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ यांच्यातर्फे “स्वराज्य दहीहंडी महोत्सव २०२२” मध्ये यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणून दहीहंडी फोडण्याचा प्रथम मान कर्णबधिर मुलांना मिळाला. डोंबिवलीतील ठाकूरवाडी येथील संवाद कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी जल्लोषात ही हंडी फोडून उत्सवाची सुरुवात केली. एकीकडे रिमझिम पावसाची बरसात तर दुसरीकडे दहीहंडी फोडण्याचा या कर्णबधिर मुलांच्या चेहऱ्यावरील निस्सीम आनंद असा दुग्धशर्करा योग यावेळी जुळून आला होता.
डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकात ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’च्या दहिहंडी उत्सवात संवाद कर्णबधिर मुलांनी प्रतिकात्मक दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फोडली. अपर्णा आगाशे संचालित ‘संवाद’ या संस्थेच्या मुलांनी ‘आम्ही पण कुठेही कमी नाही, आम्ही पण हंडी फोडू शकतो’ असा संदेश समाजाला या माध्यमातून दिला. कर्णबधिर मुलांनी मोठ्या उत्साहात या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. कर्णबधिर मुलांना दही हंडीचा आनंद लुटता यावा, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सगळे नियम कटाक्षाने पाळत ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘स्वराज्य दहीकाला उत्सवात’ पहिली हंडी फोडण्याचा मान या मुलांना देण्यात आला होता.या दहीहंडी उत्सवात सोनी टीव्ही मराठी वर नामांकित असलेली कॉमेडी मालिका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामधील प्रसिध्द कलाकार गौरव मोरे आणि शिवाली परब यांनी सुद्धा हजेरी लावली.
रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची उपस्थिती लाभली व सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा देत राज्यसरकार या उत्सवाला खेळाचा दर्जा देणार असून नोकरीत ही प्राधान्य देणार व दहीहंडी पथकाला १० लाख रुपयांचा विमा सुद्धा मिळणार ज्याचा हप्ता राज्य सरकार भरणार असल्याचे सांगितले.